महाराष्ट्र ग्रंथ भांडार
सुमारे ८५ वर्षांपूर्वी १९३६ च्या रथसप्तमीला श्री. गोविंद वामन कथा दादा कुलकर्णी यांनी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे पहिले पुस्तकाचे दुकान सुरू केले. समाजधुरीण आचार्य स.ज. भागवत, आचार्य शंकरराव देव, आचार्य जावडेकर यांच्या निकटच्या सान्निध्यामुळे दादांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवून केवळ ज्ञान देण्यासाठीच हा व्यवसाय सुरू केला. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला या प्रबोधनात्मक प्रकाशन संस्थेचे काम दादा त्यावेळी सांभाळत होते. त्याच प्रेरणेतून महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे प्रकाशनही त्यांनी सुरू केले, आणि प्रबोधनात्मक संस्कारक्षम पुस्तके प्रकाशित करून समाज बांधणीतील आपला मोलाचा वाटा उचलला. समाजातील लहानातल्या लहान घटकांपर्यंत पोहोचून, त्याला ज्ञानार्जनाची गोडी लावण्यासाठी अनेक विषय साधेसोपे करून पुस्तकरूपाने सिद्ध केले. दादा कुलकर्णी यांनी केलेल्या मौलिक प्रकाशनात खालील प्रमुख पुस्तकांचा समावेश आहे- डॉक्टर गोविंद केशव भट यांची अभिजात संस्कृत साहित्यावरील पुस्तके, श्री. गजानन बाळकृष्ण दंडगे शास्त्री यांनी सोपे केलेले संस्कृतमधील जुने दुर्मिळ साहित्य, ह्रषिकेश येथील स्वामी शिवानंद सरस्वती यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांचे श्री. भ. रा. नाईक यांनी केलेले मराठी अनुवाद- उदाहरणार्थ, यशस्वी जीवन, विचार सामर्थ्य, आपली संस्कृती, स्पर्श आनंदाचा, श्री. ना.वा. गुणाजी यांचे समग्र स्वामी रामतीर्थ, श्री. हरि दत्तात्रय अकिवाटकर यांचे श्रीभागवत भक्तीकथासागर, कुसुमताई आणि वसंतराव नारगोळकर या तत्त्वनिष्ठ दांपत्याने आदिवासी वारली समाजात राहून शब्दबद्ध केलेले अनुभव, जंगलचे राजे, पंडित गोविंदराव टेंबे यांची संगीत विषयक, जीवन व्यासंग आणि कल्पना संगीत ही पुस्तके, माननीय दादासाहेब मावळंकर यांची 'काही पावले' या नावाने दोन खंडातील दैनंदिनी, कथा-कादंबरी या ललित साहित्य प्रकारात पुढे आघाडीचे नाव कमावलेल्या डॉक्टर सुमति क्षेत्रमाडे, मालतीबाई दांडेकर यांची पहिली काही पुस्तके प्रकाशित करून दादा कुलकर्णी यांनी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे बीजारोपण केले महात्मा गांधी यांचे 'विद्यार्थ्यांशी हितगूज', पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 'आव्हान' अशी काही अभिमानास्पद प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत.
मौनी विद्यापीठ गारगोटी येथील प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेला दहा खंडातील 'आपले महाभारत' हा महाग्रंथ दादांच्या प्रकाशन कारकिर्दीतील मेरूमणी ठरला. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र या विषयांचे अभ्यासू प्राध्यापक शशिकान्त कुलकर्णी यांनी हा व्यवसाय हाताळताना, शैक्षणिक मूल्य आणि समाजहिताची भावना कायम राखत एक नवीन आयाम गाठला. त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक ललित पुस्तकांना राज्य पुरस्कारासह अनेक मान्यवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजर्षी शाहू छत्रपती यांचा 'स्मृतिग्रंथ' हे त्यांचे एक महत्त्वाचे प्रकाशन. परमपूज्य डोंगरे महाराज यांनी गुजराथीमध्ये दिलेल्या प्रवचनांचा, माननीय आप्पासाहेब महाजन यांनी हिंदीतून मराठीत केलेला श्रीमद्भागवत रहस्य हा ग्रंथ या प्रकाशनाचा एक महत्त्वाचा ऐवज ठरला आहे. 'श्रीमद्भागवत रहस्य' या ग्रंथाचे सव्विसावे पुनर्मुद्रण सध्या सुरू आहे. महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे पुस्तक प्रकाशनासोबत पुस्तक विक्रीचेही एक अग्रगण्य ठिकाण बनलेले आहे. पुस्तक प्रकाशन आणि विक्री हे व्यवसाय न मानता, ही एक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा हीच भावना मनामध्ये बाळगून ८५ वर्षांच्याही पुढे ही वाटचाल अखंड सुरु राहणार आहे......