top of page

अभिप्राय 

आपले महाभारत

१९६० च्या दशकात वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले काही अभिप्राय

केसरी

वाचक वर्ग सुविद्य, विचारवंत, चोखंदळ होऊ लागला आहे. अशा वेळी प्राचार्य दसनूरकर आपले महाभारत ज्या पद्धतीने लिहित आहेत त्या पद्धतीची व्यासकृत महाभारताची मांडणी सर्वांच्या आदरास पात्र होणारी आहे. भाषा प्रौढ व ओघवती आहे. ठिकठिकाणी सुभाषिते व सुविचार यांची पेरणी आहे. आपली संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकांनी आपले महाभारत अवश्य वाचले पाहिजे.

महात्मा

प्रौढ विद्यार्थ्यांना व अप्रोड नागरिकांना हा अनुवाद आकर्षक माननीय व आचरणीय वाटेल. बकासुराचा वध, द्रौपदीचे स्वयंवर, सुभद्रेचे हरण इत्यादी प्रसंग शिल्पकाराने इतक्या सुबोधतेने व वेधकतेने रंगविले आहेत की हा अनुवाद वाटतच नाही. विसाव्या शतकातील रमणीय व विचार-घन कादंबरीच वाटते. काही वर्णने वाचल्यानंतर नवा ग्रंथ वाचल्याचा आनंद होतो. मूळ संस्कृत संहितेशी प्रतारणा न करता आणि तिच्यात अधिक उणे न करता, सुगम, सुष्लिष्ट भाषाशैलीने संपूर्ण महाभारताचा परिचय करून देण्याचा हा उपक्रम उपयुक्त व अभिनंदनीय आहे.

सकाळ 

कठीण गोष्ट सुबोध करून सांगण्याची हातोटी प्राचार्य दसनूरकर यांना लाभली आहे. विविध क्षेत्रांतील अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे महाभारताच्या कथेशी ते समरस झाले आहेत. महाभारताचे हे शब्दशः भाषांतर नाही. त्यात नव्या काळास उपयोगी पडणारा मतितार्थ आहे. सांस्कृतिक धार्मिक वगैरे दृष्टिकोनातून त्यांना झालेले दर्शन त्यांनी वाचकांपुढे ठेवले आहे. ग्रंथकारांनी निरनिराळ्या प्रकरणांना दिलेली शीर्षके ही समर्पक व आकर्षक आहेत.

______________________________________

प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या विस्तृत महाभारताचा ग्रंथ माझ्या आईवडिलांनी मला माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी महाराष्ट्र ग्रंथ भांडार मधून घेऊन भेट दिला होता.
संस्कारक्षम वयात महाभारत वाचल्याने त्याचे माझ्या मनावर योग्य ते संस्कार त्या ग्रंथाच्या अनुषंगाने माझ्या आई-वडिलांनी  केले, त्यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी राहीन. हे ग्रंथ म्हणजे त्यांचा माझ्याकडे असलेला अमूल्य ठेवाच आहे. या ग्रंथाच्या प्रचंड आवाक्याची, त्यातल्या तत्त्वज्ञानाची प्रक्रिया आजही अखंड चालू आहे. 

या ग्रंथाची कितीही पारायणे केली तरी दरवेळी वाचताना काहीतरी नवीन गवसल्या ची जाणीव होते. त्यातील व्यक्तिरेखा आणि घटना यांच्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते आणि पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, तसेच तात्त्विक अशी अनेक पातळ्यांवर ज्ञानसमृद्धी होते.

महाभारतातील ठळक व्यक्तिरेखा जसे पांडव द्रौपदी कौरव कृष्ण यांची माहिती थोडीफार सर्वांनाच ज्ञात असते पण त्याहीपलीकडे जाऊन त्या व्यक्तिरेखांशी निगडित इतर हजारो व्यक्तिरेखा आणि अगणित कथा यांची उत्कृष्ट सांगड प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी घातली आहे. त्यांची लेखन पद्धती मंत्रमुग्ध करणारी आणि उत्कंठावर्धक आहे.
त्यातील व्यक्तिरेखा फक्त काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगांच्या फटकाऱ्यात न रंगवता, त्यांच्या इतर अनेक छटा प्राचार्य दसनूरकर यांनी दाखवल्या आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या ग्रंथातील अनेक तेजस्वी स्त्री व्यक्तिरेखांचे विस्तारपूर्वक वर्णन करून त्या व्यक्तिरेखांचे स्वभाव कंगोरे दाखवून त्यांना योग्य तो तो न्याय दिला आहे. जसे कुंतीची व्यथा आणि होणारी घालमेल,  झालेल्या वस्त्रहरणमुळे लज्जित आणि अपमानित झालेली द्रौपदी, पांडवांच्या मनात तिने सतत धुमसत ठेवलेला क्रोधाचा अग्नी ही काही ठळक उदाहरणे आहेत. 
महाभारत हे एक चिरंतन शाश्वत कालातीत सत्य आहे यावर काळाचा जास्त परिणाम झालेला नाही कारण आजही आपण महाभारतात घडलेल्या घटना आपल्या अवतीभवती घडताना बघतो. जसे भाऊबंदकी, स्त्रीची विटंबना, सूडबुद्धी, द्वेष, बेकायदेशीर मुलांच्या आणि त्यांच्या मातांच्या माथ्यावर लागलेला कलंक, सत्तेचा हव्यास वगैरे काही उदाहरणे आहेत.
व्यक्तिशः माझ्याकरता प्राचार्य दसनूरकर यांचे महाभारत एक हवेहवेसे वाटणारे चक्रव्यूह आहे ज्यामध्ये मला हरवून जायला आवडते, काळ वेळेचे भान राहत नाही आणि त्यातून बाहेर पडावेसेही वाटत नाही.

एक वाचक,

प्रिया सामंत

______________________________________

WhatsApp%20Image%202021-05-05%20at%2012.55_edited.jpg

महायोग :-

महाराष्ट्र ग्रंथ भांडारने १९६० च्या दशकात प्रकाशित केलेला व त्याकाळात वाचकांच्या पसंतीस उतरलेला प्राचार्य द.गो. दसनूरकर लिखित 'आपले महाभारत' हा ग्रंथराज नव्याने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे वृत्त वाचनात आले. आनंद झाला.

'रामायण' व 'महाभारत' यातील संस्कारमय कथा ऐकण्याची गोडी आपल्यातील अनेकांना बालपणापासूनच लागलेली असते. त्यातील अद्भूत, रोमांचक कथा सर्व वयोगटातील वाचकांना मोहित करणाऱ्या आहेत. अनेक वर्षापूर्वी दूरदर्शनवरून सादर केल्या गेलेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' व बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालीकांनी त्या काळात रस्ते ओस पडत असत. गेल्या वर्षी 'लॉकडाऊनच्या काळात काही वाहिन्यांनी दूरदर्शनवर त्या मालीकांचे पुनः प्रसारण करून तोच अनुभव घेतला व ही अजरामर महाकाव्ये कोणत्याही काळात लोकप्रियच असतात हेच सिद्ध केले.

महाभारतातील गोष्टींचा संदर्भ वयोमानानुसार व वाचकवर्गाच्या कुवतीनुसार बदलत असावा, म्हणून तर हे महाकाव्य अजरामर आहे. कोणत्याही कालखंडात महाभारत घडत असते. त्यातील पात्रे, नायक, नायिका, मार्गदर्शक, मित्र, खलपुरूष, नात्यातील गुंता, कटुता, वैफल्य, हे सर्व नवीन रूपाने आपल्या आजूबाजूस सतत सुरूच असते. हे आजचे महाभारत.

महाराष्ट्र ग्रंथ भांडारने त्या काळात प्रकाशित केलेल्या प्राचार्य दसनूरकर लिखित 'आपले महाभारत' या ग्रंथाला चांगलाच वाचकवर्ग लाभला. कै. दादा कुलकर्णी यांनी तो सर्वसामान्य वाचकवर्गाला सवडीप्रमाणे व सहजगत्या वाचता यावा या हेतूने दहा भागात त्याची विभागणी केली होती. दहा भागांची किंमत रू.दोनशे इतकी अल्प ठेवली होती. सुटे भाग देखील ते विक्रीसाठी उपलब्ध करून देत असत. सेवा मुद्रणालयात ग्रंथ मुद्रण, महाराष्ट्र ग्रंथ भांडार मध्ये ग्रंथ प्रकाशन, विक्री व वितरण ही सर्व कामे दादा कुलकर्णी यांचेकडून केली जात असत. या सर्व गोष्टी मी जवळून अनुभवल्या आहेत. व्यावसायिक आर्थिक लाभाचे गणित त्यांनी कधीच मांडले नाही.

श्रीराम जोशी

______________________________________

WhatsApp Image 2021-07-27 at 8.26.41 PM.jpeg

दसनूरकरांचे आपले महाभारत हा ग्रंथ पुनर्प्रकाशित होणार ही सकाळ मधली बातमी वाचून कोण आनंद झाला. मला तर या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन व्हावे असे वाटत होते, परंतु एवढी पुस्तके उपलब्धच नव्हती व मिळण्याची पण शक्यता वाटत नव्हती. त्यासाठी मी सर्व अठरा पर्वांच्या झेरॉक्स करून घेतल्या. कोणाला वाचायला देता याव्यात म्हणून आमच्याकडे १८ पर्व अकरा भागातील आहेत. पण असा दुर्मिळ ग्रंथ कोणाला घरी कसा बरे वाचायला द्यायचा? इतके आम्ही त्याला जपले आता पानेही जीर्ण झाली आहे. प्राचार्य दसनूरकरांच्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की भाषा सुंदर! व्यासांनी लिहिलेल्या या सत्य महाभारत कथा अत्युत्तम तत्त्वज्ञानाने गुंफीत लिहिल्या आहेत व हे तत्त्वज्ञानच लोकांपर्यंत पोहोचावे असे मला वाटते. तुमच्या पुनर्प्रकाशनाने नक्कीच जास्तीत जास्त लोकांपुढे हा ग्रंथ जाईल.
महाभारतातील दंतकथा अनेक प्रस्तुत आहेतच. महाभारत ही कथा सूडाची आहे असा खोटा प्रसार करून जनमानसावर परिणाम होईल म्हणून सर्वसामान्यांना, या ग्रंथातील सर्वांना शहाणे करून सोडणाऱ्या तत्त्वज्ञानापासून तत्कालीन परिस्थितीने वंचित केले. पण हे पुस्तक अथवा ग्रंथ आठवीपासून अभ्यासक्रमात लावले तर पिढीच्या पिढी जगात वागावे कसे यात शहाणी होईल व गृहस्थाश्रमात नोकरीत वागताना अडचणी येणार नाहीत असे खात्रीने वाटते. तुमच्या या अत्यंत स्तुत्य उपक्रमास आमच्या खूप खूप शुभेच्छा. निदान दहा दहा वर्षांनी तरी या दुर्मिळ ग्रंथाचे पुनर्प्रकाशन व्हाव.
श्री महर्षी व्यास यांना वंदन 

प्राचार्य दसनूरकर यांना वंदन

श्री प्रकाशकांना नमस्कार

                                                                                                                                        आपली वाचक,
                                                                                                                        सौ अनघा वामन कुलकर्णी

______________________________________

WhatsApp Image 2021-07-27 at 8.26.40 PM.jpeg

गोविंद वामन कुलकर्णी यांनी १९६७ साली आपले महाभारताचा आदिपर्व हा खंड प्रकाशित केला त्यावेळी आम्ही श्री शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या पुस्तकाने भारावून गेलो होतो. त्याच वेळी माझ्या वडिलांनी, एन. के. कुलकर्णी (watch maker, सांगली) यांनी प्रकाशन पूर्व पैसे भरून आपले महाभारत बुक केले होते. जेव्हा सर्व खंड आले तेव्हा ते आधाशा सारखे वाचून काढले. त्या सर्व महाभारताने मला मंत्रमुग्ध करून टाकले.
तसे अनेकांनी लिहिलेली महाभारतावर ची पुस्तके मी वाचली होती पण दसनूरकर यांचे आपले महाभारत त्या सर्वांमध्ये पहिल्या नंबरवर आहे आणि ते प्रत्येक मराठी माणसाच्या घरी अवश्य असायला हवे. व्यासांचा खूप जुना ग्रंथ असल्याने त्या भोवती अनेक दंतकथांचा चिखल आणि शेवाळे माजले असणार. तो सर्व चिखल आणि शेवाळे दूर करून दसनूरकर यांनी शुद्ध निर्मळ महाभारताचे जीवन आम्हास उपलब्ध करून दिले, त्यासाठी त्यांनी आणि प्रकाशकांना लाख लाख धन्यवा. आता पुन्हा नव्या अवतारात तेच महाभारत आपण दोन खंडात उपलब्ध करून देत आहात तेव्हा आम्हास तेव्हा आपणास कोटी कोटी धन्यवाद.
पुन्हा हर्षेत्फुल मनाने आपणास धन्यवाद!
                                                                                                                                               आपला,
                                                                                                                       वामन नारायण कुलकर्णी 
                                                                                                                                     हरिपूर, सांगली.

महाराष्ट्र ग्रंथ भांडार

Maharashtra Granth Bhandar

Mahadwar Road,

Kolhapur 416012

Maharashtra, India.

Phone no.:- 0231-2541433, 9923403944

© 2024 Maharashtra Granth Bhandar.

bottom of page